इंधन दरवाढ: “आप” ने सरकारला घेरले

सणासुदीच्या तोंडावर सरकारने सातत्याने होणारी इंधन दरवाढ थांबवावी: आम आदमी पक्ष

रोजच्या प्रमाणे काल देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. रोजच्या रोज होणारी दरवाढ ही जनतेला अक्षरशः जीवघेणी ठरत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पेट्रोलची किंमत ₹९० च्या पार गेली आहे. ज्या वेगाने पेट्रोलचे दर वाढत आहे ते पाहता लवकरच पेट्रोल ₹१०० पार करेल. विरोधी पक्षात असताना इंधन दरवाढीचा रोजच्या रोज आकांडतांडव करणारे भाजप नेते आज मात्र सोयीस्करपणे यावर मौन बाळगून आहेत.

सरकार इंधन दरवाढ कशा प्रकारे कमी करू शकते याचे विश्लेषण करणाऱ्या भाजप नेत्यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, परंतु तेच भाजप नेते आज या दरवाढीचे समर्थन करत आहेत. आंतरराष्ट्रीय इंधन दर वाढले म्हणून भाव वाढ योग्य हा सरकारचा खोटेपणा आहे. जनतेच्या प्रश्नांवर भाजपकडून केला जाणारा ढोंगीपणा आता रोज उघडा पडत आहे.

सणासुदीच्या काळात इंधनाची सातत्याने होणारी दरवाढ सर्वसामान्य जनतेला होरपळून काढत आहे. आज राज्यात इंधनावर जवळपास ३९% टक्के राज्य सरकारचा कर आकारल्या जात आहे. त्यामुळे किंमती आकाशाला भिडल्या आहेत. जनतेप्रति जर हे सरकार संवेदनशील असेल तर सरकारने तातडीने राज्य सरकारकडून आकारला जाणारा कर रद्द करावा. सरकारला जर इच्छाशक्ती असेल तर इतर ठिकाणी सरकारी योजनेतील भ्रष्टाचार थांबवून ही रक्कम वसूल करू शकते. परंतु काँग्रेस पेक्षा कुठलाही वेगळा कार्यक्रम नसलेले भाजप सरकार दरवाढ आणि पर्यायाने महागाई कमी करण्यात अपयशी ठरले आहे.

आम आदमी पक्षाची मागणी आहे की सणासुदीच्या तोंडावर सरकारने सातत्याने होणारी इंधन दरवाढ थांबवावी आणि इंधनावर आकारला जाणारा कर कमी करावा जेणेकरून जनतेला थोडा दिलासा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *